1962 INDIA - CHINA WAR : MARATHI TRANSLATION
- MVI Desk
- 1 hour ago
- 5 min read
Date:- August 2026
EDITOR'S NOTE:
The 1962 India - China War ( OLD IS GOLD FILMS ) was published by MVI on 7 Jul 2026 alongwith its Hindi version . We hope this brief description of the 64 yrs old war is being widely read not only in India but around the world.
The Marathi translation of this article is now being published due to kind courtesy of Shri Ulhas Hari Joshi .We hope it will be keenly read by the Maratha fraternity ,especially those who couldn't earlier.
Link of MVI article published on 7 Jul 26 is given below for easy reference.
Col Vinay B Dalvi
Editor, MVI
LINK OF MVI 7 JUL 26 ARTICLE
1962 सालच्या भारत चीन युद्धातील ‘विसरलेले’ महत्वाचे व्यक्तिमत्त्व
ब्रिगेडियर जॉन परशुराम दळवी
(कर्नल विनय दळवी यांच्या सौजन्याने)
उल्हास हरी जोशी (मराठी अनुवादक)
1962 सालचे भारत चीन युद्ध हे भारताच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या इतिहासातील एक ‘काळा धब्बा’ किंवा ‘black spot’ म्हणून ओळखले जाते. या युद्धात भारताचा नुसताच दारूण पराभव झाला नाही तर भारताच्या प्रतिमा, प्रतिष्ठा, आत्मसन्मान याला मोठा धक्का बसला होता. यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळुन केवळ 15 वर्षेच झाली होती आणि भारतावर हे संकट कोसळले होते. पण या हरलेल्या युद्धात सुद्धा काही जणांनी आपल्या धैर्याचे, पराक्रमाचे दर्शन घडवले होते. पण आता इतिहासाच्या पानांमधून ही नावे हळू हळू गायब होऊ लागली आहेत. यातीलच एक नाव आहे इराक मध्ये जन्मलेले ब्रिगेडियर जॉन दळवी यांचे. आज आपण त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊया.

ज्या चीनने ‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत भारता बरोबर पंचशील करार केला त्याच चीनने ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला. 20 ऑक्टोबर 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले. हे युद्ध 21 नोव्हेंबर 1962 पर्यन्त चालले. या युद्धात सर्वात जास्त नुकसान कोणाचे झाले असेल तर भारतीय आर्मीच्या 7 व्या इंन्फ्टट्री ब्रिगेडचे. या ब्रिगेडचे नेतृत्व त्या वेळी ब्रिगेडियर जॉन दळवी यांचेकडे होते. ही ब्रिगेड त्या वेळी भारताच्या उत्तर पूर्व भागात तैनात करण्यात आली होती. या भागाला पूर्वी नेफा म्हणायचे. ( नॉर्थ ईस्ट फ्रॉन्टीयर एजन्सी.) आता या भागाचे नाव अरुणाचल प्रदेश असे आहे.
20 ऑक्टोबर 1962 रोजी चिनी सैन्याने या ब्रिगेडवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात चीनने पहिल्यांदाच भारी तोफखान्याचा वापर केला( याला हेवी आर्टीलरी म्हणतात.) भारतीय सैन्यावर तोफांचा मारा करण्यात आला. परिणामी केवळ काही तासातच या ब्रिगेडचे अक्षरशः पानिपत झाले. (एका ब्रिगेड मध्य साधारणपणे 3500 ते 5000 सैनिक असतात.) यात कित्येक सैनिक मारले गेले तर अनेक सैनिक जखमी झाले. स्वतः ब्रिगेडियर जॉन दळवी सुद्धा जखमी झाले. युद्ध भुमीवरुन माघार घेण्याची नामुष्की ओढवली. 68 तास, म्हणजे जवळ जवळ 3 दिवस हे सैनिक हिमालय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या
उंच उंच टेकड्यांच्या दर्या खोर्यातुन अन्न पाण्यावाचून भटकत होते. शेवटी त्यांना चिनी सैनिकांनी पकडले आणि युद्धकैदी म्हणुन तिबेटमधील ल्हासाजवळील छळ छावणीत पाठवून दिले. यात ब्रिगेडियर दळवी पण होते. आपल्या या अनुभवांविषयी ब्रिगेडियर दळवी सांगतात, ‘ युद्ध कैदी होण्यापेक्षा मरण आले तरी परवडले असते.’ कारण कोणत्याही स्वाभिमानी आणि देशप्रेमी सैनिकाला युद्ध कैदी होण्यापेक्षा वीर मरण आलेले जास्त चांगले वाटत असते. चीनच्या या छळ छावणीत 700 पेक्षा जास्त भारतीय युद्ध कैदी होते. यात ब्रिगेडियर दळवी पण होते. या छळ छावणीत भारताविरुद्ध प्रचाराच्या लेक्चर्सचा मारा करण्यात येत होता. भारत हा वाईट देश आहे. भारतील राजकीय नेतृत्व दुबळे आहे. लष्करी नेतृत्व पण घाबरट आणि दुबळे आहे अशा प्रकारच्या लेक्चर्सचा मारा करून त्यांचे ब्रेन वॉशिंग करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. शेवटी 6 महिन्यांनी त्यांची सुटका झाली आणि ब्रिगेडियर जॉन दळवी भारतीय लष्करात परत आले.

भारतीय आर्मीला जवळ जवळ 250 वर्षांचा गौरवशाली आणि अभिमानास्पद असा इतिहास आहे. भारतीय आर्मीचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते. पण 1962 सालच्या भारत चीन युद्धात पहिल्यांदाच भारतीय आर्मीच्या नावाला बट्टा लागला. आर्मीवर टीकेची झोड उठली. लोकांच्या टिकेला आणि कुचेष्टेला सामोरे जावे लागले. कारण या युद्धात फक्त भारतीय आर्मीनेच भाग घेतला होता. भारतीय नौदल म्हणजे नेव्ही आणि वायुदल म्हणजे एअरफोर्स यांना या युद्धापासून कटाक्षाने दूर ठेवण्यात आले होते. हे युद्ध भारताच्या उत्तर भागात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या भागात झाले होते. त्या ठिकाणी नेव्हीचे काहीच काम नव्हते. पण या युद्धापासून भारतीय एअर फोर्सला का वेगळे आणि अलिप्त ठेवण्यात आले या प्रश्नाचे उत्तर अजून पर्यन्त मिळालेले नाही. या युद्धात जर भारतीय वायु दलाला भाग घेण्याची संधी मिळाली असती तर कदाचित युद्धाचा परिणाम वेगळा झाला असता असे अनेक मिलिट्री तज्ञ आजही सांगतात.
ब्रिगेडियर जॉन दळवी यांनी त्यांच्या भारत चीन युद्धातील अनुभवाबद्दल ‘ हिमालयीन ब्लन्डर’ या नावाचे पुस्तक सुद्धा लिहिले आहे. या पुस्तकाचा उद्देश कोणावरही टीका किंवा टिप्पणी करण्याचा नसून ज्याला ‘ ऑंखो देखा हाल ‘ म्हणतात या स्वरूपाचे आहे. तरी देखील या पुस्तकावर भारत सरकारने आधी बंदी घातली होती. पुढे बंदी उठल्यावर हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झाले.
जॉन दळवी यांचा जन्म 3 जुलै 1920 रोजी इराकमधील बसरा या शहरात झाला. त्यांचे वडील ब्रिटिश सरकारचे कर्मचारी होते आणि ब्रिटिश सरकार तर्फे त्यांची बसरा येथे बदली झाली होती. पुढे दळवी कुटुंबीय भारतात परतले आणि मुंबईला स्थानिक झाले. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या सेंट मेरी हायस्कूल मध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेज मध्ये झाले. ते कॉलेज मध्ये शिकत असतानाच, म्हणजे 1939 साली दुसर्या महायुद्धाला सुरवात झाली. त्यावेळी ब्रिटिशांनी मोठया प्रमाणावर त्यांच्या सैन्यात, म्हणजे ब्रिटीश आर्मीत, रिक्रुटमेन्ट करायला सुरवात केली. तरुण जॉनने कॉलेज शिक्षण अर्धवट सोडून ब्रिटिश फौजेत भरती व्हायचे ठरवले. हा त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्नींग पॉइंट ठरला. 1943 साली त्यांना ब्रिटिश इन्डीयन आर्मीत कमिशन मिळाले. त्यांची ब्रह्मदेशातील लढाईसाठी पाठवणी करण्यात आली. ही लढाई जपानी फौजेविरुद्ध होती. त्यांना सुप्रसिद्ध ब्रिटिश सेनानी फील्ड मार्शल विल्यम्स स्लीम यांच्या नेतृत्वाखाली लढायची संधी मिळाली. ब्रम्हदेशातील लढाई ही त्या काळच्या अत्यंत अवघड लढायांमध्ये गणली जाते. या लढाईत जॉन दळवी यांना डोंगरात, उंच टेकड्यांवर आणि जंगलात लढायचा अनुभव मिळाला. उत्कृष्ट फिल्ड कमांडर म्हणुन त्यांचे कौतुक पण झाले. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते भारतीय आर्मीत दाखल झाले आणि आपले कर्तुत्व तसेच अनुभवाच्या जोरावर ते ब्रिगेडियर या पदापर्यंत पोचले. भारतीय आर्मीच्या 7 व्या ब्रिगेडची कमान त्यांच्या हाती सोपविण्यात आली.

1960 साली त्यांची ब्रिगेड उत्तर पूर्व भारतातील नेफा या भागात पाठविण्यात आली होती. 1961 साली ब्रिगेडियर जॉन दळवी जेव्हा आपल्याला ब्रिगेडचा ताबा घेण्यासाठी नेफामध्ये पोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या ब्रिगेड मधील सैनिकांची अवस्था अत्यंत वाईट अशी होती. त्यांच्याकडे पुरेशी शस्त्र नव्हती, दारूगोळा नव्हता. इतकेच नव्हे तर थंडीत घालण्यासाठी लागणारे पुरेसे कपडे पण नव्हते. कारण त्या भागात प्रचंड थंडी पडते. अनेक वेळा हवेचे तापमान शून्य डिग्री सेल्सिअस खाली असते. कधी कधी बर्फ वृष्टी पण होते. त्यावेळी भारत सरकारने चीन भारत सीमेवर, ज्याला मॅकमोहन रेषा पण म्हणतात, काही मिलिट्री पोस्ट स्थापन केली होती. ती पण अत्यन्त दुर्गम अशा ठिकाणी होती. तेथे जायला चांगले रस्ते नव्हते. त्यांच्या मध्ये समन्वयाचा आणि कम्युनिकेशनचा अभाव होता. त्या भागात चांगले रस्ते जवळ जवळ नव्हेच. हा सगळा मुलूख कच्चे रस्ते आणि पायवाटांनी भरलेले होता. त्यामुळे सामानाची वाहतुक करण्यासाठी घोडे किंवा खेचरांचा वापर करावा लागे. त्यामुळे वाहतुक संथ गतीने होत असे.
बॉर्डर वरील ज्या पोस्ट होत्या त्यांचे संरक्षण करण्यासाठी या ब्रिगेडला पाठवण्यात आले होते. बॉर्डरवर गस्त घालणाऱ्या सैनिकांकडून जे रिपोर्ट येत होते ते बरेचसे खतरनाक होते. सीमेपलीकडे चीन मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव करत आहे, मोठ्या प्रमाणावर चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण करत आहे याची ग्वाही देणारे हे रिपोर्ट असायचे. यावरुन चीनचा इरादा काही चांगला नाही. चीन आपल्यावर केव्हाही हल्ला करू शकतो याची जाणीव ब्रिगेडियर दळवी यांना वारंवार होत होती. चीनने जर हल्ला केलाच तर त्याला तोंड देण्याची पुरेशी तयारी भारतीय फौजेची नाही याची पण त्यांना जाणीव होत होती. याविषयी ते वारंवार आपल्या वरिष्ठांना आणि दिल्लीतील भारत सरकारला रिपोर्ट्स पाठवून सावध करत होते. पण त्यांचे रिपोर्ट्स कोणीही गांभिर्याने घेतले नाहीत. कदाचित चीन हिमालयासारखा उत्तुंग पर्वत ओलांडून भारतावर आक्रमण करण्याचे दुःसाहस करणार नाही असा भ्रम दिल्लीतील केंद्र सरकारला तसेच तसेच दिल्लीत बसलेल्या आर्मीच्या सेनापतींना झाला असेल. शेवटी भ्रमाचा भोपळा फुटला.
जेव्हा एखाद्या युद्धात पराभव होतो तेव्हा त्या पराभवासाठी रणांगणावर लढणारे सैनिक फक्त जबाबदार नसतात. त्याला अजून काही कारणे पण असतात. ब्रिगेडिअर दळवी यांच्या मते जे भारतीय सैनिक या युद्धात लढले ते प्रामाणिकपणे लढले. आपल्या कर्तव्यात कोणतीही उणीव ठेवली नाही. काहींनी पराक्रम पण केले. तरीसुद्धा भारत हे युद्ध हरले. त्याकाळी सत्तेवर असलेल्या केंद्र सरकारचा भोंगळ कारभार, काही भ्रमिष्ट आणि स्वप्नाळू कल्पना, चुकीची धोरणे, वास्तव परिस्थिती जाणून न घेण्याची मानसिकता, चुकिचे निर्णय या सर्वांचा परीणाम म्हणजे भारताचा लज्जास्पद पराभव!

चीनच्या कैदेतून परत आल्यावर ब्रिगेडियर दळवी पुन्हा भारतीय आर्मीत दाखल झाले. पुन्हा त्यांचेकडे एका ब्रिगेडचे नेतृत्व सोपवण्यात आले. 1965 सालच्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी भाग घेतला. 1967 साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ऑक्टोबर 1974 साली, वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी कर्क रोगाने त्यांचे दुःखत निधन झाले.
ब्रिगेडियर जॉन परशुराम दळवी आजही एक अत्यंत प्रामाणिक, निर्भीड आणि स्पष्टवक्ते लष्करी अधिकारी म्हणुन ओळखले जातात. त्यांनी लिहिलेले हिमालयीन ब्लन्डर हे पुस्तक भारत सरकारच्या आणि भारतातील लष्करी नेतृत्वाच्या डोळ्यात in झणझणीत अंजन घालणारे ठरले आहे.
( संदर्भ- मायकेल दळवी यांचा मूळ इंग्रजी लेख)





Comments