top of page

मराठा सैन्यिकांचे अतुल साहस आणि पराक्रम असलेले पण ‘विसरले गेलेले’ सॅन्गचॅकचे युद्ध (कर्नल विनय दळवी यांच्या सौजन्याने)

  • gauravreporter1
  • 7 hours ago
  • 7 min read

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी आणि त्यातुनही मराठा सैन्यिंकांचे धाडस, पराक्रम, शौर्य, रणनिती, बलिदान, आत्म बलिदान या विषयींच्या कथा, सत्य कथा, प्रसंग आपण ऐकत आलो आहोत. या वर आजपर्यंत अनेक कथा, कादंबर्‍या, पुस्तके लिहिली गेली आहेत, अनेक टी.व्ही. सिरियल्स आणि चित्रपट आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पेशवाई होऊन गेली. या वेळी मराठी साम्राज्य कटक (जे सध्या भारतातील ओरिसा राज्यात आहे) ते अटक (जे सध्या पाकिस्तानात रावळपिंडीजवळ आहे.) पसरले. त्यानंतर ब्रिटिशांची राजवट आली. या राजवटीत पहिले आणि दुसरे अशी दोन जागतीक महायुद्धे झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पाकिस्तान बरोबर तीन तर चिनबरोबर एक महायुद्ध होऊन गेले. त्यानंतर कारगिल वॉर आणि अगदी अलिकडचे ऑपरेशन सिंदूर होऊन गेले. या सर्व युद्धांमध्ये मराठी सैन्यिकांनी त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची चुणूक दाखवली. कित्येक गौरवपुर्ण मेडल्स आणि अवॉर्ड्स पण मिळवली. पण या सर्वच लाढायांची माहिती अजुनही सामान्य जनतेला नाही. अजुनही कित्येक लढाया ईतिहासाच्या पानातून गायब झाल्या आहेत किंवा विसरल्या गेल्या आहेत. असेच एक युद्ध आहे दुसर्‍या महायुध्धाच्या काळातील भारताच्या पूर्व भागातील भारत ब्रह्मदेश सिमेवरील सॅन्गचॅकचे युद्ध. निवृत्त मेजर जनरल राज मेहता यांनी या युद्धाचे वर्णन ईतिहासाला कलाटणी देणारे ऐतिहासीक महत्वाचे युद्ध असे केले आहे. 


सँगचॅक गावातील वॉर मेमोरियल
सँगचॅक गावातील वॉर मेमोरियल

अलिकडच्या ईतिसासातील लढले गेलेले सर्वात मोठे युद्ध म्हणजे दुसरे महायुद्ध, जे 1939 साली सुरु झाले आणि 1945 साली संपले. हे युद्ध 6 वर्षे 1 दिवस चालले. या युद्धात पश्चिमेकडे युरोपमध्ये जर्मनीच्या हिलटलरच्या नाझी फौजेने जसे थैमान घातले होते तसेच थैमान पूर्वेकडील पूर्व आशिया खंडात जपानच्या सैन्याने घातले होते. जपानी सैन्याची ओळख त्यावेळी 138 वर्षे अजिंक्य असलेले सैन्य किंवा 138 वर्षात एकदाही पराभव न झालेले सैन्य अशी होती. जपानी सैन्याचे मुख्यालय जरी टोकियो असले तरी या सैन्याने सिंगापूरमध्ये दुसरे मुख्यालय उभे केले होते आणि पूर्व आशियामधील युद्धाची सर्व सुत्रे येथुन हलवली जात होती. त्याचवेळी जपानी सैन्याला भारतातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेत्रृत्वाखाली स्थापन झालेल्या आझाद हिंद फौजिची पण साथ मिळाली होती. याच फौजेच्या मदतीने भारताच्या पूर्वेला असलेल्या ब्रह्मदेशातून भारतावर हल्ला करून आणि भारतात असलेल्या इंफाळ - कोहिमा महामार्गावर ताबा मिळवून सरळ दिल्लीपर्यंत कुच करायची योजना जपानी सैन्याने आखली होती. 


यातील सर्वात अवघड भाग होता तो म्हणजे ब्रम्हदेशातील युद्ध. कारण हा सगळा परिसरच मुळी उंच उंच डोंगरांनी आणि टेकड्यांनी वेढलेला आहे. चिंदवीन, इरावती आणि सालवीन नद्यांच्या खोर्‍यामूळे हा भाग विभागला गेलेला आहे. या तीनही नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वहात येऊन बंगालच्या उपसागरास मिळतात. त्या मुळे हा प्रदेश दलदलीचा आहे. मान्सुनमध्ये या देशात 5 महिने मुसळधार पाऊस कोसळतो. त्यामूळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर जंगले वाढतात. अगदी 8000 फूट उंच असलेल्या डोंगरावर सुद्धा मोठमोठी जंगले पसरलेली असतात. या देशात हाताच्या बोटावर मोजता येतील येव्हडीच शहरे आहेत बाकी सर्व प्रदेश छोट्या छोट्या खेडेगावांचा. जास्त करून नागा लोकांची वस्ती असलेला. पावसाळा संपला की सगळीकडे पाण्याचे दुर्भिक्ष सुरु होते. वातावरण तसे रोगटच. मलेरिया, डेंग्यु, कॉलरा, डिसेन्ट्री यांसारख्य साथीच्या रोगांचे थैमान सतत चालुच. मुख्य रस्ते किंवा ज्याला टार रोड किंवा डांबराचे रस्ते म्हणतात ते अगदीच मर्यादीत. घाटातील वळणावळणाचे कच्चे रस्ते किंवा पायवाटा हाच काय तो खुष्किचा मार्ग. या भागात सैन्य आणणे तसे कठीणच. आणि जरी सैन्य आणले तरी त्याला लागणारी रसद सतत पुरवणे आणखी कठीण. कारण घनदाट जंगल असल्यामूळे एअर ड्रॉपिंगला अनेक मर्यादा. तसेच जमिनीवरून सामान वाहुन न्यायचे म्हणजे घोड्यांचा, खेचरांचा किंवा गाढवांचा उपयोग अनिवार्य त्यामूळे वाहतूक अगदी संथ गतीने. त्यामूळे सैन्यासाठी लागणारा दारुगोळा, हत्यारे, सैनिकांसाठी लागणारे रेशन, गाड्यांसाठी लागणारे पेट्रोल, डिझेल सारखे इंधन, अन्न शिजवण्यासाठी लागणारे रॉकेल, दवा, औषधे यांचा सतत, वेगाने आणि खात्रिशीर पुरवठा मिळणे कठीणच. त्यातुन जपानी सैन्याला अशा प्रकारच्या जंगली प्रदेशात लढण्याचा उत्तम अनुभव तर ब्रिटिश सैन्याकडे याचा अभाव. असे असुनही भारतातील ब्रिटीश सैन्याने ब्रम्हदेशातील जपानी सैन्याशी प्राणपणे लढण्याचा निर्धार केला. 


ब्रह्मदेशाचा नकाशा
ब्रह्मदेशाचा नकाशा

ऑगस्ट 1943 मध्ये भारतातील ब्रिटिश सैन्याच्या कमांडचे विभाजन करून ब्रिटिश आणि अमिरेकन सैन्याची मिळून एक वेगळी ऍन्ग्लो अमेरिकन साउध इस्ट एशिया कमांडची स्थापना करण्यात आली. या कमांडचे सुप्रीम कमांडर ब्रिटनचे ऍडमिरल लुई माऊंटबॅटन होते ( जे पुढे भारताचे व्हाइसरॉय आणि पहिले गव्हर्नर जनरल बनले आणि ज्यांच्या कारकिर्तीत भारताला स्वातंत्र्य मिळाले, भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान नावाचा एक नवीन मुस्लीम देश जन्माला आला) तर अमेरिकेचे जनरल ज्यो स्टिलवेल डेप्युटी कमांडर होते. याच कमांडच्या अंतर्गत बर्मा बॉर्डर या नावाने ब्रह्मदेशातील लढाईसाठी सैन्याची उभारणी करण्यात आली. यामध्ये ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्याबरोबरच भारतीय सैन्यांची नवीनच स्थापन झालेली 51 पॅरॅ ब्रिगेड आणि त्यांच्या बरोबर 200 वर्षांपेक्षाही जास्त असा अभिमानास्पद आणि गौरवास्पद ईतिहास असलेल्या मराठा लाईट इन्फ्रंटिच्या 4 थी आणि 5 वी तुकडी पण समाविष्ट करण्यात आली पण शेवटपर्यंत ही तुकडी 4 थी तुकडी म्हणुनच ओळखली जात होती. 


सन 1943 साली जपानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर ब्रह्मदेशावर आक्रमण करून बराच प्रदेश जिंकला होता. जपानी सैन्याचे नेतृत्व जनरल मासाकावू कावाबे यांचेकडे होते. ते अत्यंत अनुभवी, शिस्तप्रीय, धडाडीचे आणि कुशल नेतृत्वासाठी प्रसिद्ध होते. जंगलांमध्ये लढण्याचा त्यांना प्रदिर्घ अनुभव होता. सैन्याच्या सप्लाय लाईनचे महत्व ते जाणून होते. त्यांच्या हाताखाली ले.ज. रेन्या मागाचुकी हे एक अत्यंत धडाडीचे अणि संतापी स्वभावाचे सेनानी होते. भारतावर आक्रमण करून ईम्फाळ कोहिमा महामार्गावर सत्ता प्रस्थापीत करण्याची योजना त्यांचीच होती. युध्ध जर जिंकायचे असेल तर भरभक्कम सल्पाय लाईन असणे जरुरीचे आहे हे ते जाणून होते. त्यामूळे युध्ध जिंकणे सोपे जाते. या उलट ब्रिटिश सैन्याची परिस्थिती होती. 


एकतर ब्रिटिश सैन्याला जंगलात लढायचा कोणताच अनुभव नव्हता. जे ब्रिटिश जनरल्स होते ते अत्यंत अननुभवी होते. लंडनमध्ये बसुन ब्रम्हदेशातील युध्धाचे प्लॅनिंग करणारे जे कोणी स्ट्रॅटेजीक प्लॅनर्स होते त्यांना ब्रम्हदेशातील भौगोलीक परिस्थितिची अजीबात कल्पना नव्हती. दुसरी मोठी समस्या म्हणजे या फौजेत भारतीय सैन्यिक मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यांचे जे ब्रिटिश किंवा अमेरिकन कमांडर्स होते त्यांना भारतीय जवानांना समजेल अशी हिन्दी किंवा उर्दु भाषा अजीबात येत नव्हती. सप्लाय लाईन तर अत्यंत लेचिपेची होती. ब्रह्मदेशातील ब्रिटिश फौजेला लागणारी रसद आधी भारतातील कलकत्ता येथे ब्रॉड गेज रेल्वेने यायची. मग पुढे बोटितून ती आसाममधील दिमापूरला यायची. त्यावेळी दिमापूर ते ईम्फाळ अशी एक मिटर गेज रेल्वे लाईन होती. त्या रेल्वेने ती रसद ईम्फाळला यायची. ईम्फाळ कोहिमा असा एक चिंचोळा पण पक्का डांबरी रस्ता होता तो जवळ जवळ भारत ब्रह्मदेश सिमेला समांतर होता. त्या रस्त्यावर ही रसत छोट्या जीपमधून किंवा छोट्या ट्रक मधून भारत ब्रह्मदेश सिमेवर आयची. पुढे ही रसद रस्यांच्या अभावी गाढव किंवा खेचरांवरून ब्रिटिश सैन्याच्या छावणीपर्यंत आणली जायची. हे सगळे संथ गतीने व्हायचे आणि याला बराच वेळ लागायचा. विमानातून एअर ड्रॉप पद्धतीने पाठवलेली रसद जास्त करून जपानी सैन्याच्या हातात पडायची. त्यामूळे बहुतेक वेळा ब्रिटिश सैन्याला अपुर्‍या शस्त्रसामग्री, दारुगोळा आणि रेशन शिवाय लढावे लागायचे. तसेच पाण्याचे दुर्भिक्ष होतेच. अजुन मोठी समस्या म्हणजे अनेक ब्रिटिश सैनीक साथिच्या रोगांमूळे आजारी पडु लागले. युद्धात जखमी झालेल्या सैन्यिकांपेक्षा आजारी सैन्यिकांची संख्या जास्त होऊ लागली. यांच्या औषध पाण्याची व्यवस्था करणे पण कठीण जाऊ लागले. याच्या उलट जपानी सैन्याची परिस्थिती होती. त्यांच्यात आजारी पडणार्‍या सैन्यिकांची संख्या खुपच कमी असायची. पुरेसे डॉक्टर्स आणि औषधे उपलब्ध असायची. 


जपानी सैन्याच्या चढाईचा नकाशा
जपानी सैन्याच्या चढाईचा नकाशा

परिणाम प्रत्येक ठिकाणी ब्रिटिश सैन्या मार खाऊ लागले आणि माघार घेऊ लागले. ब्रम्हदेशातील ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्याच्या पराभवाची अनेक रसभरीत वर्णने जपानी रेडियोवरून प्रसारीत व्हायला लागली होती आणि ब्रिटिशांचा सगळिकडे दारूण पराभव होतो आहे असा खोटा प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होता. नाही म्हटले तरी याचा बराचसा नकारात्मक परिणाम ब्रिटीश फौजेतील जवानांनवर होत होता. ब्रिटिश फौजेला जपानी फौजेने तीन बाजुने वेढा घातला. माघार घ्यायला एकच बाजु होती ती म्हणजे भारताच्या सिमेकडे जाणारी बाजु. पण हा मार्ग काही सोपा नव्हता. हा मार्ग अनेक डोंगर, दर्‍या, उंच सखल खाचखळगे, दलदल, घनदाट जंगले, वेडेवाकडे रस्ते आणि पायवाटा यातून जाणारा होता. जंगली श्वापदांचे, साप विंचु यांसारख्या जिवघेण्या विषारी प्राण्यांचे भय होते. ब्रिटिश सेनेला जपानी सैन्य नेमके कोठे आहे याचे आकलन होत नव्हते. जेव्हा वाटायचे की जपानी सेना वीस मैलांवर आहे तेव्हा ती प्रत्यक्षात दोन मैलांवर असायची. जपानी सैन्याने ब्रिटिश सेनेचे रेडियो कम्युनिकेशन पण हाणुन पाडले होते. एकुण ब्रिटिश सैन्याला पराभवाशिवाय आणि शरणागतीशिवाय दुसरा कुठला उपाय दिसत नव्हता. 


1944 सालच्या जानेवारी महिन्यात जपानी सेनेने मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश सेनेवर आक्रमण करायला सुरवात केली. भारत ब्रह्मदेश सिमेपासून 45 मैल अंतरावर सँगशॅक नावाचे नागा लोकांची वस्ती असलेले एक छोटेसे खेडेगाव आहे. या गावाजवळील टेकडीवर असलेल्या एका छोट्याश्या पठारावर ब्रिटीश सेनेने आपली शेवटची छावणी उभारली. काहिही झाले तरी जपानी सैन्याला भारतातील ईम्फाळ कोहिमा रोड घेऊ द्यायचा नाही हे ध्येय ठेवले. कारण जर जपानी सेनेने हे ठाणे जिंकले असते तर भारतीय सिमेपर्यंत पोचायला त्यांना एक तास किंवा दिड तासांपेक्षा जास्त वेळ लागला नसता. 


21 मार्च 1944 साली सँगचॅकच्या हातघाईच्या लढाईला सुरवात झाली. ही लढाई 6 दिवस चालली होती. आधी जपानी सैनिकांचा मोठा जोर होता. ब्रिटिश सैन्याने भारतातून कुमक मागवली होती पण ती पोचायला उशीर लागणार होता. सुरवातीच्या लढाईत ब्रिटिश फौजेचे मोठे नुकसान झाले. अनेक सैन्यीक धारातिर्थी पडले. सगळीकडे प्रेतांचा खच पडला होता. आणि या वेळी लढाईची सुत्रे मराठा लाईट इन्फ्रन्टीच्या 4 थ्या युनिटच्या मराठा सैन्यिकांनी हातात घेतली. त्यांनी मोठ्या धाडसाने आणि निर्धाराने जपानी आक्रमणाला धिराने तोंड दिले. या युद्धात मराठा सैन्यिकांनी त्यांच्यातील शोर्य, धाडस, पराक्रम, एकी, रणनिती, उच्च दर्जाची शिस्त याचे प्रदर्शन केले. या सहा दिवसांच्या लढाईत जपानी सैन्याचे आक्रमण तर रोखले गेलेच पण त्यांची दाणादाण उडाली. भारतातील ईम्फाळ कोहिमा रोडवर आपले प्रभुत्व प्रस्थापीत करून भारताच्या दिल्ली पर्यंत मजल मारणाच्या त्यांच्या स्वप्नांचे वाटोळे झाले. थोडक्यात ब्रिटिश सैन्य जवळ जवळ हरलेले युद्ध जिंकले. 


सँगचॅकच्या लढाईचा नकाशा
सँगचॅकच्या लढाईचा नकाशा

ब्रिटिश जनरल डब्यु जे बिल स्लिम, जे पुढे फिल्ड मार्शल झाले आणि ब्रिटनमधील सर्वोकृष्ट सेनानी म्हणुन गौरवले गेले, यांनी या युद्धाचे वर्णन ‘एक अविस्मरणीय युद्ध’ असे केले आहे. जपानी जनरल मियाझाकी यांनी पण या युद्धाचे पण असेच वर्णन केले आहे. जपानी जनरल मियाकाझी या युद्धातील मराठा सैन्यिकांचा पराक्रम बघून एव्हडे प्रभावीत झाले होते की जेव्हा मराठा रेजिमेन्टचे कमांडर कॅप्टन बान धारातिर्थी पडले तेव्हा जनरल मियाझाकी यांनी, मराठा सैन्यिकांचा आदर म्हणुन  आपली मानाची तलवार त्यांना प्रेझेन्ट केली आणि लष्करी इतमामाने त्यांचे अंत्य संस्कार केले. गार्डिनर हॅरिस यांनी त्यांच्या 21 जुन 2000 च्या न्युयॉर्क टाईम्स मधिल लेखात या यद्धाबद्दल लिहिले आहे, हा संपूर्णपणे भारतीय सैन्याचा विजय होता पण भारतीयांना याचा विसर पडला आहे. 


हे युद्ध खरोखरच ईतिहासाला कलाटणी देणारे युद्ध होते. या युद्धात जर जपानी सेनेचा विजय झाला असता तर भारतातील सध्याची पुर्वेकडील राज्ये (आसाम, मेघालय वगैरे), ज्यांनी भारताच्या क्षेत्रफळाचा जवळ जवळ एक त्रितियांश भाग व्यापला आहे, ती भारतात राहिली नसती, ब्रह्मदेशाचा भाग झाली असती. 


सँगचॉकच्या पठाराचा नकाशा
सँगचॉकच्या पठाराचा नकाशा

ब्रिटिश नेव्हल कमांडर अर्ल माऊंटबॅटन यांचेसाठी सुद्धा हे युद्ध महत्वाचे ठरले. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढली आणि त्यांना फर्स्ट अर्ल माउंटबॅटन ऑफ बर्मा हे पद मिळाले आणि हीच त्यांची शेवटपर्यंत ओळख राहिली. त्यामुळेच त्यांची भारतातील ब्रिटिशांचे शेवटचे व्हाइस रॉय म्हणुन निवड झाली. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 पर्यंत भारताचे व्हाइस रॉय होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. सन 1979 साली त्यांची ब्रिटनमध्ये आयरीश रिपब्लिकन आर्मिकडून हत्या करण्यात आली.. 


1944 सालच्या मार्च महिन्यात लढल्या गेलेल्या या युद्धाला आता 82 वर्षे होऊन गेली आहेत. भले भारतीय लोक हे युद्ध विसरले असतील पण ब्रिटिश आर्मी हे युद्ध विसरलेली नाही. ब्रिटिश आर्मिने या युद्धाची आठवण म्हणून सँगच्याकला भव्य असे वॉर मेमोरियल उभे केले आहे. आता तरी मराठी लोकांनी या द्धाचा अभिमान बाळगावा एव्हडीच अपेक्षा. 

 
 
 

Comments


bottom of page