top of page

BATTLE OF BURJ 1971 WAR ,AMRITSAR SECTOR - PUNJAB : MARATHI TRANSLATION OF BATTLE

  • MVI Desk
  • Aug 4
  • 6 min read

Date :-04 August 2026

EDITOR'S NOTE :

This marathi translation of the Battle of Burj by Shri Ulhas Joshi is published below .The original English account by Maj Gen Raj Mehta was published by Fauji India Magazine in May 2019 issue . It was first published in Mar 2019 by Force Magazine.


The translation will benefit keen readers not only in Maharashtra but also in India and around the globe. It has special significance for readers based in Pune as the Salunkhe Vihar AWHO Housing Society, located near Wanowadi ,Pune, is named after Sep Pandurang Salunke ,MVC (P) the famed and highest gallantry award winner of this battle of . Ironically, the Burj Battalion - 15 Maratha LI is presently located at Shivneri military camp,Aundh - Pune . This translation is dedicated to 15 Maratha LI which glorified the Regt of Maratha LI , Indian Army and India and amply brought to life , the rich and historical legacy of Shri Chhatrapati Shivaji Maharaj ! The unit won the battle honour of ' Burj' and theatre honour - ' Punjab' .


The PDFs of the original English version by Maj Gen Raj Mehta of Force Magazine and Fauji India are given below for interested readers.


Col Vinay B Dalvi,Pune

Editor, MVI


पुण्यातील साळुंखे विहारचे पांडुरंग बाळकृष्ण साळुंखे आणि बुर्जची लढाई


(कर्नल विनय दळवी यांच्या सौजन्याने)


(संदर्भ निवृत्त मेजर जनरल राज मेहता यांचा मूळ इंग्रजी लेख)


उल्हास हरी जोशी (मराठी अनुवादक)


पुण्यातील वानवडी जवळ साळुंखे विहार नावाची एक सेवा निवृत्त सैनिकांची वसाहत आहे. या भागात अनेक सोसायटी आणि घरे आहेत. ही कॉलनी पुण्यातील कॅम्प एरिया, घोरपडी, वानवडी, हडपसर, कोंढवा या लोकवस्तीच्या जवळ आहे. यातील बहुतेक बंगले आणि घरे भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांचे आहेत. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधून रिटायर झालेले अनेक ऑफिसर या भागात राहातात. भारतीय लष्करातील मराठा लाईट इन्फट्री मधील शिपाई पांडुरंग साळुंखे यांनी 1971 साली लढल्या गेलेल्या भारत पाकिस्तान युद्धात मोठी मर्दुमकी गाजवली. मोठे शौर्य आणि पराक्रम दाखवला. त्यामुळे पंजाब मधील बुर्ज येथील महत्त्वाच्या लढाईला मोठी कलाटणी मिळाली. या लढाईमध्ये ते शहीद झाले. मृत्यूनंतर महावीर चक्राने त्यांना सन्मानीत करण्यात आले. पांडुरंग साळुंखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात साळुंखे विहार ही फौजी अधिकाऱ्यांची वसाहत वसवण्यात आली. यासाठी भारतीय लष्कराने मोठा पुढाकार घेतला. आज आपण त्यांची आणि बुर्ज येथील लढाईची ओळख करून घेऊया.



मराठा लाईट इन्फट्री ही भारतीय लष्करातील अत्यंत महत्त्वाच्या आणि सुप्रसिद्ध असलेल्या रेजिमेंट पैकी एक आहे. जगातील सगळ्यात जुन्या रेजिमेंट मधील ही चौथ्या क्रमांकाची रेजिमेंट आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात या रेजिमेंटने दोन व्हिक्टोरिया क्रॉस सकट जवळ जवळ 258 अत्यंत प्रतिष्ठित आणि मानाची मेडल्स आणि अवॉर्ड मिळवली आहेत.


मराठा बटालियनची स्थापना ब्रिटिशांनी 1768 मध्ये ब्रिटिश फौजेचा एक विभाग म्हणुन केली.याला आता 258 वर्षे होऊन गेली आहेत. त्यावेळच्या ब्रिटिश सेनापतींच्या डोक्यात चपळ, हुषार, धाडसी, पराक्रमी आणि निष्ठावान तरुणांची फौज तयार करावी असे येऊ लागले होते. या तरुणांचे मुख्य काम रणांगणात लढणार्‍या सैनिकांना मदत करणे, त्यांना रसद आणि इतर लागेल ती मदत पोहोचवणे, वेळ पडल्यास युद्धात बदली सैनिक म्हणुन भाग घेणे हे होते. ब्रिटीशांना अशा प्रकारचे तरुण भारतील महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील मराठी बोलणार्‍या, किंवा ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशा समाजात, तसेच कर्नाटकातील कुर्ग भागात मोठ्या प्रमाणावर मिळाले. यातील बहुतेक सैनिकांची मातृभाषा मराठी होती. त्यामुळे या तुकडीचे नाव


मराठा इन्फट्री असे ठेवण्यात आले. इन्फट्री का तर यांचे मुख्य काम लढाईमध्ये फ्रंटवर. म्हणजे आघाडीवर असायचे. पुढे यांच्या हातात वजनाने हलकी अशी शस्त्रे देण्यात आली आणि या युनिटचे नाव मराठा लाईट इन्फट्री असे झाले. ब्रिटिश सैन्यात हे मराठी सैनिक गणपत या नावाने ओळखले जायचे. या गणपतांनी पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धासकट अनेक युद्धात मोठे पराक्रम गाजवले. व्हिक्टोरिया क्रॉस सकट अनेक महत्वाची पदके आणि अवॉर्ड मिळवली.


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात जेव्हढी युद्धे झाली त्या प्रत्येक युद्धात या रेजिमेंटने भाग घेतला आणि आपल्या शौर्य आणि पराक्रमाचा परिचय करून दिला. 1922 सालापासून या रेजिमेंटचे मुख्यालय कर्नाटकातील बेळगाव येथे आहे. त्याला पण आता 104 वर्षे झाली आहेत.


प्रत्येक बटालियनचे एक घोषवाक्य किंवा स्लोगन असते. या घोषवाक्यामुळे रेजिमेंट मधील जवानांच्या अंगात जोश किंवा स्फूर्ती निर्माण होत असते. ‘ बोल श्री छत्रपती शिवाजी महाराजकी जय’ हे मराठी रेजिमेंटचे मुख्य घोषवाक्य आहे. यामागे पण थोडा इतिहास आहे. आधी या रेजिमेंटचे घोषवाक्य हे नव्हते. वेगळे होते. ( ते हर हर महादेव असे होते) दुसर्‍या महायुद्धाच्या काळात उत्तर आफ्रिकेतील सुदान मधील लढाईत मराठा सैनिकांची गाठ इटालियन फौजेशी पडली. त्यावेळी आधी इटालियन सैनिक भारी पडत होते. मराठी फौजेला माघार घ्यायला भाग पाडत होते. त्यावेळी मराठी फौजेचा कमांडर कॅप्टन बूमगर्ट याने या घोषणेचा पहिल्यांदा उपयोग केला, कारण त्याला माहीत होते की मराठी मातृभाषा असलेल्या लोकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत आदराची, प्रेमाची, आपुलकीची, आपलेपणाची आणि अभिमानाची भावना आहे. या स्लोगनचा चांगला सकारात्मक परीणाम झाला. मराठी


सैन्याने इटालियन फौजेला पराभवाचे पाणी पाजले. त्यांना इटलीमध्ये माघार घ्यायला भाग पाडले. त्यानंतर इटालियन फौज परत कधी डोके वर काढू शकली नाही. तेव्हापासुन मराठा रेजिमेंटचे हेच घोषवाक्य झाले.


शिवाजी महाराजांचे नाव जगातील सर्वश्रेष्ठ 100 सेनापती (warriors) मध्ये घेतले जाते. या यादीत अलेक्झान्डर द ग्रेट, लॉर्ड ऑर्थर वेलस्ली,


ड्युक ऑफ वेलीन्गटन, सम्राट अकबर, जनरल हरी सिंग नलवा, महाराजा रणजितसिंह यांची नावे आहेत.


कर्तव्य, आत्मसन्मान आणि निधड्या छातीचे हे मराठा रेजिमेंट मधील गणपतांचे ब्रीदवाक्य आहे आणि प्रत्येक वेळी ते सिद्ध करत आले आहेत.


Sep Pandurang Salunkhe, MVC (Posthumous) & Maj Ranbir Singh, VrC (now Brig Retd)
Sep Pandurang Salunkhe, MVC (Posthumous) & Maj Ranbir Singh, VrC (now Brig Retd)


जिंकलेल्या प्रत्येक युद्धाचे कोणी ना कोणीतरी हिरो हे असतात. या हिरोंनी दाखवलेल्या शौर्य, धाडस, पराक्रम, समय सूचकता, बलिदान यामुळे सकारात्मक परिणाम होऊन युद्ध जिंकले जाते. थोडक्यात युद्धातील विजयामध्ये त्यांचे मोठे योगदान असते. बुर्जच्या महत्त्वाच्या लढाईचे हिरो निर्विवादपणे पांडुरंग साळुंखे होते.


3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने पाश्चिम पाकिस्तान मधून भारतावर जोरदार हवाई हल्ले करायला सुरुवात केली. त्याच दिवशी मध्य रात्री त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारत पाकिस्तान युद्धाची घोषणा केली. युद्ध होणार याची कल्पना असल्यामुळे भारतीय सेना भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर युद्ध करण्यासाठी तयारच होती. या दोन्ही आघाड्यांवर मराठा रेजिमेंटचे गणपत मोठ्या प्रमाणावर होते. युद्ध सुरू होताच भारताच्या पूर्व आघाडीवरील फौजेने पूर्व पाकिस्तानवर (आत्ताचा बांगलादेश ) जोरदार आक्रमण करून पूर्व पाकिस्तानात घुसखोरी करायला सुरवात केली. यावेळी त्यांना पूर्व पाकिस्तानात स्थापन झालेल्या मुक्ती वाहिनीचे पाठबळ मिळाले. पण भारताच्या पश्चिम आघाडीवर मात्र परिस्थिती एकदम विरुद्ध होती. या आघाडीवर पाकिस्तानने पाश्चिम पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून


भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांना सुरवात केली होती.


भारतातील पंजाब मधील अमृतसर जवळ असलेले फतेपुर हे ठिकाण फार महत्वाचे आहे. हे ठिकाण अमृतसरच्या उत्तर पश्चिमेला, रावी नदीच्या जवळ आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील लष्करासाठी हे ठिकाण महत्वाचे आहे. कारण हा सगळा सपाट प्रदेश आहे आणि रणगाड्यांसकट जमिनीवरून आक्रमण करण्यासाठी योग्य आहे. या मार्गाने पाकिस्तानी लष्कर भारतामधील अमृतसर पर्यन्त आक्रमण करून अमृतसर शहराचा ताबा घेऊ शकते. त्याच प्रमाणे भारतीय फौज पाकिस्तानवर आक्रमण करून लाहोर पर्यन्त जाऊन लाहोरवर ताबा मिळवू शकते.


3 डिसेंबर 1971 रोजी , मध्यरात्री, पाकिस्तानी सैन्याने फतेपुर भागावर मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले. यामध्ये पाकिस्तानी फौजेतील 43 बलुच रेजिमेंट आघाडीवर होती. त्याला तोंड द्यायला मराठा लाईट ईन्फ्ट्रीची 15 वी ब्रिगेड तयार होती. त्यांच्या मदतीसाठी भारतीय बनावटीच्या वैजयंता रणगाड्यांची एक तुकडी पण देण्यात आली होती. या फौजेचे नेतृत्व मेजर रणबीरसींग करत होते . ते स्वतः निधड्या छातीचे उत्कृष्ट कमांडर म्हणून ओळखले जात होते. त्यांना 66 आर्मर्ड रेजिमेंटचे सेकंड लेफ्टनंट ए.एस.चिमा, कॅप्टन चेरीयन, बी.एस.एफ.चे सिनीयर इन्स्पेक्टर अजीतसींग यांची साथ होती.


आधी पाकिस्तानी सैन्य भारी पडत होते. त्यांनी फतेपुर सकट आजूबाजूची अनेक महत्त्वाची ठाणी जिंकली होती. यामध्ये बुर्ज येथील महत्त्वाचे ठाणे पण होते. पाकिस्तानी सैन्याला कुठेतरी रोकणे आवश्यक होते. यासाठी बुर्जची निवड करण्यात आली. यासाठी पाकिस्तानी सैन्याला भ्रमात ठेवण्यासाठी वेगळी रणनीती आखण्यात आली. बुर्जवर दोन बाजूने हल्ला करायचा. आधी मराठा सैनिकांची एक तुकडी पाठवायची. त्यामागे वैजयंता रणगाडे पाठवायचे. पाकिस्तानी सैनिकांना वाटले पाहिजे की फक्त पायदळातील सैनिकांनी हल्ला केला आहे.


6 डिसेंबरला संध्याकाळी पावणेपाच वाजता लढायला सुरवात झाली. पाकिस्तानी सैन्याकडून बेछूट गोळीबार आणि शक्तिशाली ग्रेनेडचा मारा सुरू झाला होता. शिपाई पांडुरंग साळुंखे आघाडीवर लढत होते. एक शक्तिशाली ग्रेनेड त्यांचेजवळ येऊन पडला. या ग्रेनेडचा स्फोट झाला तर अनेकांचे प्राण धोक्यात येतील हे ओळखून त्यांनी तो ग्रेनेड दूर भिरकावून दिला. पण हे करताना ग्रॅनाईट चा स्फोट झाला आणि त्यात पांडुरंग साळुंखे जबर जखमी झाले. पण आपल्या जखमांची पर्वा न करता गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांवर गोळीबार करत राहिले. त्यामध्ये त्यांना वीरमरण आले. त्यांचे साथीदार शिपाई हनुमान मोरे यांनी हे काम पूर्ण केले. पाकिस्तानचा गोळीबार थांबला. पांडुरंग साळुंखे यांनी जे धाडस दाखवले ते असामान्य होते.


पांडूरंग साळुंखे यांच्या बलिदानामुळे मराठा सैन्य खवळून उठले. त्यांनी पाकिस्तानच्या बलुच रेजिमेंटवर जोरदार प्रहार करायला सुरवात केली. या रेजिमेंटला पराभवाचे पाणी पाजायला सुरवात केली. या लढाईत 30 मराठा सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले. या उलट पाकिस्तानच्या बलुच रेजिमेंटचे 200 च्या वर सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले. काही पाकिस्तानी सैनिक रावी नदी पोहून क्रॉस करत असताना मृत्युमुखी पडले.


बलुच रेजिमेंटचा कमांडर लेफ्टनंट कर्नल सईद हसानुद्दीन रणांगणावरुन पळून गेला. जाताना महत्त्वाची कागदपत्रे असलेली सुटकेस टाकून निघून गेला. पुढे ही सुटकेस भारतीय सैन्याच्या हातात पडली. त्यामुळे पाकिस्तानची बरीच गुप्त माहिती मिळाली. पाकिस्तानच्या पुढील राजनीतीचे नकाशे मिळाले. याचा भारतीय फौजेला खूप फायदा झाला.

या युद्धात पाकिस्तानच्या 43 बलुच रेजिमेंटच्या अत्यन्त लज्जास्पद पराभव झाला. पुढे या रेजिमेंटच्या कपाळार “ या पुढे युद्धात भाग घ्यायला असमर्थ किंवा आयोग्य हा शिक्का कायमचा बसला.


या युद्धात शिपाई पांडुरंग साळुंखे यांनी जे असामान्य धैर्य आणि पराक्रम दाखवला याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पुण्याला त्यांच्या नावाची कॉलनी करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन देण्यात आले.


भारतीय लष्कराचे एक वैशिष्ठ्य आहे. या लष्करात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला मान सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे. आणि हे प्राणपणाने जपले जात आहे. परमवीर चक्र सारखी गॅलेंटरी अवॉर्ड देताना माणसाची कॅटेगरी पहिली जात नाही. त्याचे कौशल्य, त्याचे धाडस, त्याने केलेला पराक्रम याला महत्व दिले जाते.


बुर्जचे, युद्ध हे 1971 सालच्या भारत पाकिस्तान युद्धातील एक महत्त्वाचे युद्ध म्हणून ओळखले जाते.




Comments


bottom of page