मराठा सैनिकांचे अतुलनीय साहस व पराक्रम असलेले पण विसरले गेलेले शंगशक चे युद्ध
- Ulhas Hari Joshi

- May 21
- 8 min read
Date :- 21st May 2026
MVI EDITOR'S NOTE :
The original article of the Battle of Shangshak of WW - 2 ,Burma front ,1944 is a well researched piece written by Maj Gen Raj Mehta and published by Force Magazine in March ,2022 issue (Please refer PDF below ) . This piece was later also published by Fauji India Magazine.
On popular demand of the Maratha LI fraternity of 4th Battalion this Marathi translation of the battle has been painstakingly done by Mr Ulhas Joshi on special request by me through Gp Capt AG Bewoor. Iam indeed grateful and obliged to both Mr Ulhas Joshi and Gp Capt AG Bewoor . Iam also most thankful to my friend and coursemate ,Col YK Umralkar who finely edited this Marathi translation . Although this marathi version in not a literal word by word translation of the english article it aptly and vividly narrates the entire Shangshak battle story for easy understanding of marathi readers .
I dedicate this Marathi translation of the battle to all the officers and soldiers of the fighting 4th battalion who fought in this great battle ,especially those who lost their lives or were wounded . As the Japanese themselves have revealed after many decades ,this battle definitely helped turn the tide against the Japs and consequently led to the Allied victory against the Japanese invasion into India through Burma . Iam sure that a long felt need of knowing a lot about this battle ,especially the finer details through the Marathi language will now be fulfilled. Kindly read and forward / circulate to all interested readers. Victory India!
With Best Wishes ,
Col Vinay B Dalvi, Editor MVI
PDF English original version ,Mar ,2022 ,Force Magazine.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी आणि त्यातूनही मराठा सैनिकांचे धाडस, पराक्रम, शौर्य, रणनिती, बलिदान, आत्म बलिदान या विषयावरील कथा, सत्य कथा, प्रसंग आपण ऐकत आलो आहोत. यावर आजपर्यंत अनेक कथा, कादंबऱ्या, पुस्तके. लिहिली गेली आहेत, अनेक टीव्ही सीरियल्स आणि चित्रपट आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पेशवाई होऊन गेली. या वेळी मराठी साम्राज्य कटक (जे सध्या भारतातील ओरिसा राज्यात आहे) ते अटक ( जे सध्या पाकिस्तानात रावळपिंडीजवळ आहे) पसरले. त्यानंतर ब्रिटिशांची राजवट आली. या राजवटीत पहिले व दुसरे अशी दोन जागतिक महायुद्धे झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पाकिस्तानबरोबर तीन व चीनबरोबर एक अशी युद्धे होऊन गेली. त्यानंतर कारगिल युद्ध आणि अलिकडेच ऑपरेशन सिंदूर होऊन गेले. या सर्व युद्धांमध्ये मराठी सैनिकांनी त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची चुणूक दाखवली. कित्येक गौरवपूर्ण मेडल्स आणि अवॅार्ड्स पण मिळवली. पण या सर्वच लढायांची माहिती अजूनही सामान्य जनतेला नाही. अजूनही कित्येक लढाया इतिहासाच्या पानांमधून गायब झाल्या आहेत किंवा विसरल्या गेल्या आहेत. असेच एक युद्ध आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील भारताच्या पूर्व भागातील भारत ब्रह्मदेश सीमेवरील शंगशकचे युद्ध. सेवानिवृत्त मेजर जनरल राज मेहता यांनी या युद्धाचे वर्णन इतिहासाला कलाटणी देणारे ऐतिहासिक महत्वाचे युद्ध असे केले आहे.

अलिकडच्या इतिहासातील लढले गेलेले सर्वात मोठे युद्ध म्हणजे दुसरे महायुद्ध, जे 1939 साली सुरु झाले आणि 1945 साली संपले. हे युद्ध 6 वर्षे 1 दिवस चालले. या युद्धात पश्चिमेकडे युरोपमध्ये जर्मनीच्या हिटलरच्या नाझी फौजेने जसे थैमान घातले होते तसेच थैमान पूर्वेकडील पूर्व आशिया खंडात जपानच्या सैन्याने घातले होते. जपानी सैन्याची ओळख त्यावेळी 138 वर्षे अजिंक्य असलेले सैन्य किंवा 138 वर्षांत एकदाही पराभव न झालेले सैन्य अशी होती. जपानी सैन्याचे मुख्यालय जरी टोकियो असले तरी या सैन्याने सिंगापूरमध्ये दुसरे मुख्यालय उभे केले होते आणि पूर्व आशियामधील युद्धाची सर्व सूत्रे येथून हलवली जात होती. त्यावेळी जपानी सैन्याला भारतातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आझाद हिंद फौजेची पण साथ मिळाली होती. याच फौजेच्या मदतीने भारताच्या पूर्वेला असलेल्या ब्रह्मदेशातून भारतावर हल्ला करून आणि भारतात असलेल्या इंफाळ कोहिमा महामार्गावर ताबा मिळवून सरळ दिल्लीपर्यंत कूच करायची योजना जपानी सैन्याने आखली होती.
यातील सर्वात अवघड भाग होता तो म्हणजे ब्रह्मदेशातील युद्ध, कारण हा सगळा परिसरच मुळी उंच उंच डोंगरांनी आणि टेकड्यांनी वेढलेला आहे. चिंदवीन, इरावती आणि सालवीन नद्यांच्या खोऱ्यामुळे हा भाग विभागला गेलेला आहे. या तीनही नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत येऊन बंगालच्या उपसागरास मिळतात. त्यामुळे हा प्रदेश दलदलीता आहे. मान्सूनमध्ये या देशात 5 महिने मुसळधार पाऊस कोसळतो. त्यामुळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर जंगले वाढतात. अगदी 8000 फूट उंच असलेल्या डोंगरावर सुद्धा मोठमोठी जंगले पसरलेली असतात. या देशात हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच शहरे आहेत, बाकी सर्व प्रदेश छोट्या छोट्या खेडेगावांचा. जास्त करून नागा लोकांची वस्ती असलेला. पावसाळा संपला की सगळीकडे पाण्याचे दुर्भिक्ष सुरू होते. वातावरण तसे रोगटच. मलेरिया, डेंग्यू, कॅालरा, डिसेंट्री यांच्यासारख्या साथीच्या रोगांचे थैमान सतत चालूच. मुख्य रस्ते किंवा ज्याला टार रोड किंवा डांबराचे रस्ते म्हणतात ते अगदीच मर्यादित. घाटातील वळणावळणाचे कच्चे रस्ते किंवा पायवाटा हाच काय तो खुश्कीचा मार्ग. या भागात सैन्य आणणे तसे कठीणच. आणि जरी सैन्य आणले तरी त्याला लागणारी रसद पुरवणे आणखी कठीण, कारण घनदाट जंगल असल्यामुळे एअर ड्रॅापिंगला अनेक मर्यादा. तसेच जमीनीवरून सामान वाहून न्यायचे म्हणजे घोड्यांचा, खेचरांचा किंवा गाढवांचा उपयोग अनिवार्य त्यामुळे वाहतूक अगदी संथ गतीने. त्यामुळे सैन्यासाठी लागणारा दारूगोळा, हत्यारे, सैनिकांसाठी लागणारे रेशन, गाड्यांसाठी लागणारे पेट्रोल, डीझेल सारखे इंधन, अन्न शिजवण्यासाठी लागणारे रॅाकेल, गवा, औषधे यांचा सतत, वेगाने आणि खात्रीशीर पुरवठा मिळणे कठीणच. त्यातून जपानी सैन्याला अशा प्रकारच्या जंगली प्रदेशात लढण्याचा उत्तम अनुभव तर ब्रिटिश सैन्याकडे याचा अभाव. असे असूनही भारतातील ब्रिटिश सैन्याने ब्रह्मदेशातील जपानी सैन्याशी प्राणपणे लढण्याचा निर्धार केला.
अॅागस्ट 1943 मध्ये भारतातील ब्रिटिश सैन्याच्या कमांडचे विभाजन करून ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्याची मिळून एक वेगळी अॅंग्लो अमेरिकन साउथ इस्ट एशिया कमांडची स्थापना करण्यात आली. या कमांडचे सुप्रीम कमांडर ब्रिटनचे ॲडमिरल लुई माउंटबॅटन होते (जे पुढे भारताचे व्हाइसरॉय आणि पहिले गव्हर्नर जनरल बनले आणि ज्यांच्या कारकिर्दीत भारताला स्वातंत्र्य मिळाले, भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान नावाचा एक नवीन मुस्लिम देश जन्माला आला) तर अमेरिकेचे जनरल ज्यो स्टिलवेल डेप्युटी कमांडर होते. याच कमांडच्या अंतर्गत बर्मा बॅार्डर या नावाने ब्रह्मदेशातील लढाईसाठी सैन्याची उभारणी करण्यात आली. यामध्ये ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्याबलोबर भारतीय सैन्याची नवीनच स्थापन झालेली 51 पॅरा ब्रिगेड आणि त्यांच्याबरोबर 200 वर्षांपेक्षाही जास्त अभिमानास्पद आणि गौरवास्पद इतिहास असलेल्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या 4थी व 5वी तुकडी पण समाविष्ट करण्यात आली पण शेवटपर्यंत ही तुकडी 4 थी तुकडी म्हणूनच ओळखली जात होती.

सन 1943 साली जपानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर ब्रह्मदेशावर आक्रमण करून बराच प्रदेश जिंकला होता. जपानी सैन्याचे नेतृत्व जनरल मासाकावू कावाबे यांच्याकडे होते. ते अत्यंत अनुभवी, शिस्तप्रिय, धडाडीचे आणि कुशल नेतृत्वासी प्रसिद्ध होते. जंगलामध्ये लढण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव होता. सैन्याच्या सप्लाय लाईनचे महत्त्व ते जाणून होते. त्यांच्या हाताखाली ले.ज. केन्या मागाचुकी हे अत्यंत धडाडीचे आणि संतापी स्वभावाचे सेनानी होते. भारतावर आक्रमण करून इंफाळ कोहिमा मार्गावर सत्ता प्रस्थापित करण्याची योजना त्यांचीच होती. युद्ध जर जिंकायचे असेल तर भरभक्कम सप्लाय लाईन असणे जरूरीचे आहे हे ते जाणून होते. त्यामुळे युद्ध जिंकणे सोपे जाते. या उलट ब्रिटिश सैन्याची परिस्थिती होती.
एक तर ब्रिटिश सैन्याला जंगलात लढायचा कोणताच अनुभव नव्हता. जे ब्रिटिश जनरल होते ते अत्यंत अनुभवी होते. लंडनमध्ये बसून ब्रह्मदेशातील युद्धाचे प्लॅनिंग करणारे जे कोणी स्ट्रॅटेजिक प्लॅनर्स होते त्यांना ब्रह्मदेशातील भौगोलिक परिस्थितीची अजिबात कल्पना नव्हती. दुसरी मोठी समस्या म्हणजे या फौजेत भारतीय सैनिक मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यांचे जे ब्रिटिश किंवा अमेरिकन कमांडर्स होते त्यांना भारतीय जवानांना समजेल अशी हिंदी किंवा उर्दू भाषा अजिबात येत नव्हती. सप्लाय लाईन तर अत्यंत लेचीपेची होती. ब्रह्मदेशातील ब्रिटिश फौजेला लागणारी रसद आधी भारतातील कलकत्ता येथे ब्रॅाड गेज रेल्वेने यायची. मग पुढे बोटीतून ती आसाममधील दिमापूरला यायची. त्यावेळी दिमापूर ते इंफाळ अशी एक मीटर गेज रेल्वे लाईन होती. त्या रेल्वेने ती रसद इंफाळला यायची. इंफाळ कोहिमा असा एक चिंचोळा पण पक्का डांबरी रस्ता होता तो जवळ जवळ भारत ब्रह्मदेश सीमेला समांतर होता. त्या रस्त्यावर ही रसद छोट्या जीपमधून किंवा छोट्या ट्रकमधून भारत ब्रह्मदेश सीमेवर यायची. पुढे ही रसद गाढव किंवा खेचरांवरून ब्रिटिश सैन्याच्या छावणीपर्यंत आणली जायची. हे सगळे संथ गतीने व्हायचे आणि याला बराच वेळ लागायचा. विमानातून एअर ड्रॅाप पद्धतीने पाठवलेली रसद जास्त करून जपानी सैन्याच्या हातात पडायची. त्यामुळे बहुतेक वेळा ब्रिटिश सैन्याला अपुऱ्या शस्त्रसामुग्री, दारूगोळा आणि रेशनवरच लढावे लागायचे. तसेच पाण्याचे दुर्भिक्ष होतेच. अजून मोठी समस्या म्हणजे अनेक ब्रिटिश सैनिक साथीच्या रोगामुळे आजारी पडू लागले. युद्धात जखमी झालेल्या सैनिकांपेक्षा आजारी सैनिकांची संख्या जास्त होऊ लागली. यांच्या औषध पाण्याची व्यवस्था करणे पण कठीण जाऊ लागले. याच्या उलट जपानी सैन्याची परिस्थिती होती. त्यांच्यात आजारी पडणाऱ्या सैनिकांची संख्या खूपच कमी असायची. पुरेसे डॅाक्टर आणि औषधे उपलब्ध असायची.

परिणाम प्रत्येक ठिकाणी ब्रिटिश सैन्य मार खाऊ लागले. ब्रह्मदेशातील ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्याच्या पराभवाची रसभरित वर्णने जपानी रेडियोवरून प्रसारित व्हायला लागली होती आणि ब्रिटिशांचा सगळीकडे दारुण पराभव होतो आहे असा खोटा प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होता. नाही म्हटले तरी याचा बराचसा नकारात्मक परिणाम ब्रिटिश फौजेतील जवानांवर होत होता. ब्रिटिश फौजेला जपानी फौजेने तीन बाजूंनी वेढा घातला. माघार घ्यायला एकच बाजू होती ती म्हणजे भारताच्या सीमेकडे जाणारी बाजू. पण हा मार्ग काही सोपा नव्हता. हा मार्ग अनेक डोंगर, दऱ्या, उंच सखल खाचखळगे, दलदल, घनदाट जंगले, वेडेवाकडे रस्ते आणि पायवाटा यांतून जाणारा होता. जंगली श्वापदांचे, साप विंचू यांसारख्या जीवघेण्या विषारी प्राण्यांचे भय होते. ब्रिटिश सेनेला जपानी सैन्य नेमके कुठे आहे याचे आकलन होत नव्हते. जेव्हा वाटायचे की जपानी सेना वीस मैलांवर आहे तेव्हा ती प्रत्यक्षात दोन मैलांवर असायची. जपानी सैन्याने ब्रिटिश सेनेचे रेडिओ कम्युनिकेशन पण हाणून पाडले होते. एकूण ब्रिटिश सैन्याला पराभवाशिवाय आणि शरणागतीशिवाय दुसरा कुठलाही उपाय दिसत नव्हता.
1944 सालच्या जानेवारी महिन्यात जपानी सेनेने मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश सेनेवर आक्रमण करायला सुरुवात केली. भारत ब्रह्मदेश सीमेपासून 45 मैल अंतरावर शंगशक नावाचे नागा लोकांची वस्ती असलेले एक छोटेसे खेडेगाव आहे. या गावाजवळील टेकडीवर असलेल्या एका छोट्याशा पठारावर ब्रिटिश सेनेने आपली शेवटची छावणी उभारली. काहीही झाले तरी जपानी सैन्याला भारतातील इंफाळ कोहिमा रोड घेऊ द्यायचा नाही हे ध्येय ठेवले. कारण जर जपानी सेनेने हे ठाणे जिंकले असते तर भारतीय सीमेपर्यंत पोहोचायला त्यांना एक तास किंवा दीड तासापेक्षा जास्त वेळ लागला नसता.
21 मार्च 1944 साली शंगशकच्या हातघाईच्या
लढाईला सुरुवात झाली. ही लढाई 6 दिवस चालली होती. आधी जपानी सैनिकांचा मोठा जोर होता. ब्रिटिश सैन्याने भारतातून कुमक मागवली होती पण ती पोहोचायला उशीर लागणार होता. सुरुवातीच्या लढाईत ब्रिटिश फौजेचे मोठे नुकसान झाले. अनेक सैनिक धारातीर्थी पडले. सगळीकडे प्रेतांचा खच पडला होता. आणि या वेळी लढाईची सूत्रे मराठा लाईट इन्फंट्रीच्याा 4 थ्या युनिटच्या मराठा सैनिकांनी हातात घेतली. त्यांनी मोठ्या धाडसाने आणि निर्धाराने जपानी आक्रमणाला धिराने तोंड दिले. या युद्धात मराठा सैनिकांनी त्यांच्यातील शौर्य, धाडस, पराक्रम, एकी, रणनिती, उच्च दर्जाची शिस्त याचे प्रदर्शन केले. या सहा दिवसांच्या लढाईत जपानी सैन्याचे आक्रमण तर रोखलेत, पण त्यांची दाणादाण उडवली. भारतातील इंफाळ कोहिमा रोडवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करून भारताच्या दिल्लीपर्यंत मजल मारण्याच्या त्यांच्या स्वप्नांचे वाटोळे झाले. थोडक्यात ब्रिटिश सैन्य जवळजवळ हारलेले युद्ध जिंकले.
ब्रिटिश जनरल डब्ल्यु जे बिल स्लिम, जे पुढे फील्ड मार्शल झाले आणि ब्रिटनमधील सर्वोत्कृष्ट सेनानी म्हणून गौरवले गेले, यांनी या युद्धाचे वर्णन ‘एक अस्विमरणीय युद्ध‘ असे केले आहे. जपानी जनरल मियाझाकी यांनी पण या युद्धाचे असेच वर्णन केले आहे. जपानी जनरल मियाझाकी या युद्धातील मराठा सैनिकांचा पराक्रम बघून एवढे प्रभावित झाले होते की जेव्हा मराठा रेजिमेंटचे कमांडर कॅप्टन बान धारातीर्थी पडले तेव्हा जनरल मियाझाकी यांनी मराठा सैनिकांचा आदर म्हणून आपली मानाची तलवार त्यांना प्रेझेंट केली आणि लष्करी इतमामाने त्यांचे अंत्यसंस्कार केले. गार्डिनर हॅरिस यांनी त्यांच्या 21 जून 2000 च्या न्यूयॉर्क टाइम्स मधील लेखात या युद्धाबद्दल लिहिले आहे. हा संपूर्णपणे भारतीय सैन्याचा विजय होता पण भारतीयांना याचा विसर पडला आहे.

हे युद्ध खरोखरच इतिहासाला कलाटणी देणारे युद्ध होते. या युद्धात जर जपानी सेनेचा विजय झाला असता तर भारताची सध्याची पूर्वेकडील राज्ये (आसाम, मेघालय वगैरे), ज्यांनी भारताच्या क्षेत्रफळाचा जवळजवळ एक तृतीयांश भाग व्यापला आहे, ती भारतात राहिली नसती, ब्रह्मदेशाचा भाग झाली असती.
ब्रिटिश नेव्हल कमांडर अर्ल माउंटबॅटन यांचेसाठी सुद्धा हे युद्ध महत्वाचे ठरले. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढली आणि त्यांना फर्स्ट अर्ल माउंटबॅटन अॅाफ बर्मा हे पद मिळाले आणि हीच त्यांची शेवटपर्यंत ओळख राहिली. त्यामुळेच त्यांची भारतातील ब्रिटिशांचे शेवटचे व्हाईसरॉय म्हणून निवड झाली. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, म्हणजे 15 ॲागस्ट 1947 पर्यंत ते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. 1979 साली त्यांची ब्रिटनमध्ये हत्या करण्यात आली.

1944 सालच्या मार्च महिन्यात लढल्या गेलेल्या या युद्धाला 82 वर्षे होऊन गेली आहेत. भले भारतीय लोक हे युद्ध विसरले असतील पण ब्रिटिश आर्मी हे युद्ध विसरलेली नाही. ब्रिटिश आर्मीने या युद्धाची आठवण म्हणून शंगशकला भव्य असे वॅार मेमोरियल उभे केले आहे. आता तरी मराठी लोकांनी या युद्धाचा अभिमान बाळगावा एवढीच अपेक्षा.
Translators Bio profile :
Ulhas Hari Joshi , was
born on 24th May 1946. A Mechanical Engineer who spent his career in Marketing and Sales. With over 50 years of experience in this field he switched to Financial Services Sector and remains active in this field for past 22 yrs .
He has a passion for writing. His book Marketing For Everybody was published in USA in 2005. He has written number of articles in Marathi which are published in many Marathi reputed publications.





Comments